‘सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका’, एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा
![Worrying! 49,447 in the state and 9090 in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow.jpg)
नवी दिल्ली – ‘ज्या रुग्णांना सौम्य लक्षण असलेला कोरोना झाला,त्यांना पुन्हा कोरोनाच संसर्ग होऊ शकतो,’ असं एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करावं , असं आवाहन त्यांनी केलं.
राज्यात सध्या कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला असला तरी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत कोरोना संक्रमनाची तिसरी लाट आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ही कोरोना संक्रमनाची तिसरी लाट नसून दुसरीच लाट असल्याचं स्पष्टीकरण एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर गुलेरिया यांनी दिलं.
“दिल्लीत सध्या कोरोनाची दुसरी लाट असून तिचा वेग आता वाढला आहे. यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा, मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणं हे प्रमुख कारणे आहेत”, असं गुलेरिया यांनी सांगितलं.
दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग वाढण्यामागे प्रदुषण हेदेखील महत्त्वाचं कारण असल्याचं डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितलं. “प्रदुषणामुळे विषाणू अधिक काळपर्यंत हवेमध्ये राहतो. प्रदुषण आणि विषाणू दोघांमुळे फुफ्फासांवर परिणाम होतो”, असं ते म्हणाले.
“कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नागरिकांना आता योग्य नियम पाळले नाहीत, काळजी घेतली नाही, तर यापेक्षा जास्त परिस्थिती बिघडेल”, असा इशारा डॉक्टर गुलेरिया यांनी दिला.
दिवाळी आणि छठ पुजा निमित्त डॉक्टर गुलेरिया यांनी लोकांना व्हर्चअली भेटण्याचा सल्ला दिला. “सण कमी साजरा करा. कारण यावर्षी आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे. जे राहिल ते पुढच्या वर्षी करा”, असं आवाहन डॉक्टर गुलेरिया यांनी केलं.