सोन्याने गाठला उच्चांक; प्रतितोळा किंमत ऐकून व्हाल थक्क
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-54.jpg)
मुंबई : मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना पुन्हा एकदा विक्रमी आकडा ओलांडलेला आहे. दर दिवशी सोन्याच्या दरांत ठराविक किंमतीनं वाढ होत असतानाच मंगळवारी मात्र या दरांमध्ये विक्रमी तेजी आल्याचं पाहायला मिळालं आहे. सराफा बाजारात सोन्याला आलेली ही झळाळी पाहता मागील चोवीस तासांत हे दर तब्बल ३ हजारांनी वाढलेले आहेत. परिणामी मुंबईमध्ये सध्याच्या घडीला हे दर ५४ हजारांच्याही पलीकडे पोहोचलेले आहेत.
कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नंतरच्या टप्प्यामध्ये ठराविक कालावधीच्या अंतरानं व्यापार सुरु करण्यात आले. पण, अद्यापही संपूर्ण व्यापार सुरु झालेले नाहीत. ज्यामुळं शेअर बाजारत बरीच उलथापालथही सुरु आहे. पण, या साऱ्यामध्ये सराफा बाजारात सोन्याचे दर मात्र नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरांनी ५४ हजारांचा आकडा ओलांडलेला असतानाच चांदीचे दरही गगनाला भिडू लागलेले आहेत. प्रति किलोसाठी चांदीचे दर ७० हजारांवर पोहोचले आहेत. मागील वर्षभराच्या कालावधीत सोनं आणि चांदीच्या दरामध्ये झालेली ही विक्रमी वाढ झालेली आहे.