सुनील केदार ग्वाल्हेरचा गड लढवणार, ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Sunil-Kedar.jpeg)
वर्धा | काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या खांद्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहणार आहेत. म्हणजेच नुकतेच भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सुनील केदार आव्हान देतील.
मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह, तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात येत्या काळात पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केले आहे.