सात वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या
![धक्कादायक! २७ दिवसांच्या बाळाचा भिंतीवर डोकं आपटून खून; सख्ख्या आईनेच ‘या’ कारणामुळे केलं कृत्य](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/murder-1.jpg)
सांगली : इस्लामपूर रोडवरील तुंग येथे एका सात वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या मुलींवर अत्याचार केले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तनात करण्यात आली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी सांगितले.
तुंग येथील विठ्ठलाईनगरामध्ये चांदोली धरणग्रस्तांची वसाहत आहे. या वसाहतीत राहणारी सात वर्षांची मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता खाऊ आणण्यासाठी दुकानाला गेली होती. बराच काळ झाला तरी मुलगी परत आली नाही म्हणून रात्रीच तिचा शोध सुरू केला होता. मात्र ती मिळाली नाही.
गुरुवारी सकाळी पिडीताच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर वासू पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोकीत मोठी जखमही झाली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश दंडिले यांनी पथकासह धाव घेतली. तसेच अप्पर अधीक्षक श्रीमती डुबुले यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रवाना करण्यात आले आहे. मुलीवर अत्याचार झाले असावेत अशी प्राथमिक माहिती मिळाली असून तिच्या पार्थिवाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.