सांगली जिल्हा कारागृहातील आणखी 22 जणांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/4jail_109-scaled.jpg)
सांगली – सांगली जिल्हा कारागृह कैद्यांनी हाऊसफुल्ल असून, त्यातच आता कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे कारागृह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सांगली जिल्हा कारागृहातील आणखी 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यात 19 कैदी आणि 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत सांगली कारागृहात एकूण 85 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या 85 पैकी 82 कैद्याना कोरोना झाला आहे. आता कोरोनाबाधित कैदयांना सांगलीतील एका महाविद्यालयातील अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
सांगली जिल्हा कारागृह हे कैदयांनी पुर्णत: भरलेले आहे. कारागृहात 205 पुरूष तर, 30 महिला अशा 235 बंदी ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र कैद्यांची संख्या वाढत गेली आणि त्यातच गेल्या कित्येक महिन्यात जामिनावरील सुनावणी न झाल्याने हे कारागृह ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या या कारागृहात एकूण 319 बंदी आहेत. त्यामध्ये 295 पुरूष आणि 24 महिलांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आलेल्या पन्नास कैदयांना कारागृहा शेजारील एका शाळेत ठेवण्यात आले आहे.