शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/narendra-darade.jpg)
नाशिक : वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे नाशिकमधील येवला शहर कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह इतर अधिकाऱ्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र दराडे हे येवला शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना समजले. यानंतर दराडे यांनी तातडीने कोरोना तपासणी केली.
त्या तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दराडे यांनी उपचारासाठी मुंबईत धाव घेतली. त्यांच्यावर पुढील तपासणीनंतर लीलावती किंवा फोर्टिस रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली.
नरेंद्र दराडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दराडे हे कार्यकर्त्यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते. यामुळे येवला शहरातील शिवसैनिकांमध्येही चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.