शाहू मार्केट यार्ड बाजार समितीतील जनावरांचा बाजार रविवारपासून सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/COW.jpg)
कोल्हापूर- कोल्हापुरातल्या शाहू मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीकडून घेण्यात आला असून कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बाजार बंद असलेल्या हा बाजार आता येत्या 15 नोव्हेंबरपासून भरणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्वच नियम आणि अटींचे पालन करून हा बाजार भरवण्यात येणार आहे. बाजार समितीमध्ये प्रत्येक रविवारी जनावरांचा बाजार भरत असतो. यामध्ये विविध भागातून म्हैस, गाय, बैल, शेळी, मेंढी, बकरी विकण्यासाठी शेतकरी येतात. यातून प्रत्येक रविवारी अंदाजे 50 लाखांची उलाढाल होत असते. मात्र कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यांपासून बाजार पूर्णपणे बंद होता. त्यामुळे गेल्या 7 महिन्यांमध्ये 140 कोटींची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क तसेच सामाजिक अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात येणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.