शाहीनबागमध्ये आंदोलनासाठी अनुराग कश्यपची हजेरी…अमित शाहांबद्दल मनात सन्मान नसल्याचं केलं वक्तव्य…

राजधानी दिल्लीतील शाहीनबागमध्ये मागील 2 महिन्यांपासून नागरिकता दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व महिला करत आहेत. सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचं केंद्र बनलेल्या शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने हजेरी लावली. या दरम्यान त्याने नरेंद्र मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. तसंच अमित शाहांबद्दल अजिबात मनात सन्मान नसल्याचंही ते म्हणाले…

दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांना संबोधित करताना अनुराग कश्यप म्हणाला की, ‘मला गेल्या बऱ्याच दिवसांपासून शाहीन बागमध्ये येण्याची इच्छा होती. तुम्हा लोकांमुळे खूप हिम्मत मिळते, याच हिमतीमुळे देशात इतरही शाहीन बाग तयार झाले आहेत.’



तसंच, ‘मी येथे येऊन स्टेजवर बिर्यानी खाण्याचा विचार करत होतो. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. ही लढाई खरच खूप अवघड आहे. धैर्याची लढाई आहे, जी तुम्ही लढत आहात आणि खूप लोक तुम्हाला पाहत आहेत, ते विचार करत आहेत की, तुम्ही सोडून निघून जाणार.मी सरकारच्या अनेक गोष्टींशी असहमत आहे. सरकारकडे हृदय नाही, त्यांना प्रेमाची परिभाषाच समजत नाही. फक्त या पद्धतीने आपण लढू शकतो. सरकारला तुम्ही फक्त प्रेम देत रहा, सरकारला फक्त ताकदीला आपल्या हातात ठेवायचं आहे. त्यांनी कोणतीच वचनं पाळली नाहीत. मी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. भारत सीमारेषांनी नाही तर येथील लोकांनी बनतो.’असं म्हणत अनुराग कश्यप यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला…

त्यानंतर अमित शहांवर निशाणा साधत अनुराग कश्यप म्हणाले की, ‘आपल्या देशाचे गृहमंत्री आपल्याला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, तर त्यांना गृहमंत्री कसं म्हणाव?’ अनुराग म्हणाला की, जर कोणताही गैरसमज असेल तर सरकारने शाहीन बागमध्ये यावं आणि त्यांच्याशी बोलावं, जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तोडगा कसा निघणार?’




