विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरची तणावातून आत्महत्या
नाशिक | महाईन्यूज
विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकमधील सिन्नर येथील एका महिलेने डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे तणावत असलेल्या डॉक्टरने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव गोविंद गोरे असे आहे. ते सिन्नरमध्ये स्नेहल रुग्णालय चालवायचे. एक महिला रुग्ण त्यांच्याकडे पित्तावर उपचार घेण्यासाठी येत होती, मागील बऱ्याच काळापासून या महिलेवर उपचार सुरु होते. एकदा चेकअपदरम्यान गोरे यांनी या महिला रुग्णाला ‘तू मला खूप आवडते,’ असं सांगितलं असता या प्रकारामुळे संतापलेल्या महिलेने थेट सिन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टर गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर डॉक्टर गोरे प्रचंड तणावात आले अन यामधूनच त्यांनी टोकाचे पाउल उचलत आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे.