ताज्या घडामोडी

रावेत येथे निवासी शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेखला अटक

पिंपरी (Pclive7.com):- “मी तुला फिजिकली इन्व्हॉल्व्ह होऊन डेव्हलप करेन. तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा” असे म्हणत क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेखने दहावीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेख याने दहा वर्षांपूर्वी देखील असाच गुन्हा केल्याने त्याला अटक करण्यात आली होती. यावेळेस क्रिएटिव्ह अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीला देखील या घृणास्पद कृत्यात सहभागी असल्याच्या कारणाने अटक करण्यात आली आहे. वर्षभरानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय ५८) आणि माजी विद्यार्थिनी रागिणी पाटील या दोघांना तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून, सध्या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित १६ वर्षीय मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, रावेत पोलीस ठाण्यात या प्रकरणी बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, विनयभंग आदी कलमांतर्गत ३० जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी याबाबत माहिती दिली. रावेत कॉर्नर येथे नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली निवासी शाळा चालवतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन मुलांना-मुलींना आठवी ते बारावी करिता निवासी शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी सेमिनारद्वारे प्रोत्साहित करतो. सन २०२१ मध्ये शेख याने यवतमाळमध्ये जाऊन अशाच प्रकारे सेमिनार घेतला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववी इयत्तेमध्ये निवासी शाळेत २ लाख २६ हजार रुपये भरून प्रवेश घेऊन दिला होता.

 

या शाळेमध्ये सध्या सुमारे ७५ मुली आणि शंभरहून अधिक मुले आठवी ते बारावी इयत्तेचे शिक्षण घेत आहेत. येथे शिकणाऱ्या मुलांना मोबाईल वापरण्यास तसेच कुटुंबाशी संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. महिन्यातून एकदा पालक मीटिंगसाठी आल्यानंतर आपल्या पाल्याला भेटू शकतात, असा येथील नियम आहे. त्यामुळे येथे घडणाऱ्या प्रकाराची माहिती पाल्य आपल्या पालकांना वेळीच देऊ शकत नाहीत. शेख हा या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या मुलींच्या हॉस्टेलमध्येच पहिल्या मजल्यावर राहतो. त्याने पीडित मुलगी १४ वर्षांची असताना वारंवार अत्याचार केले आहेत. मुलीवर सुरुवातीला २०२२ मध्ये त्याने तो राहात असलेल्या फ्लॅटमध्ये बोलावून घेत विनयभंग करून अत्याचाराचा प्रयत्न केला होता. तेव्हा पीडित मुलीने त्याला विरोध करून तिथून निघून गेली होती. मात्र त्यानंतर शेख हा पीडित मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन, असे धमकावू लागला.

 

२०२२ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत शेख याने पीडित मुलीला ‘तुला उटणे लावून आंघोळ घालून देतो, असे म्हणत तिचा विनयभंग करून पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या दिवशी शेख याने या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या त्यावेळेस तेथे बारावी इयत्तेत शिकणाऱ्या रागिणी पाटील या मुलीसमोर पीडित मुलीबाबत अश्लील शेरेबाजी करत ती तयार होत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे रागिणी पाटील हिने पीडित मुलीला शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

पुन्हा शेख याने नोव्हेंबर २०२२ मध्ये “मी तुला फिजिकली इन्व्हॉल्व्ह होऊन डेव्हलप करेन. तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा. तुला परदेशात पाठवेन, असे म्हणत पीडित मुलीला हॉस्टेलमधील फ्लॅटवर बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. यावेळी शेख याने त्याच्या मोबाईलमधील अनेक मुलींचे त्याच्याबरोबर असलेले अश्लील फोटो आणि व्हीडीओ दाखवले होते. यानंतर वारंवार शेख हा पीडित मुलीवर अत्याचार करीत राहिला.

 

सुमारे दोन वर्ष हा सर्व प्रकार सुरू असताना, पीडितेच्या वडिलांनी अकरावी इयत्तेसाठी पीडितेला जून २०२३ मध्ये सायन्स या विभागाकरिता प्रवेश घेऊन दिला. नववी-दहावी इयत्तेत असताना दोन वर्ष हा सर्व प्रकार सहन केल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी शिक्षण घेणे अशक्य असल्याचे सांगून, मला यापुढे येथे शिकायचे नाही. मला घरी घेऊन चला, असे पीडितेने ऑगस्ट २०२३ मध्ये वडिलांना सांगितले. पीडितेच्या आई-वडिलांनी तिला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावाकडे जायचे आहे असे सांगितले. मात्र पीडिता आता तेथे राहण्यास तयार नव्हती, त्यामुळे तिला आई-वडिलांनी गावाकडे नेले.

 

या सर्व कालावधीमध्ये पीडितेने क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये का राहायचे नाही याचे कारण मात्र आई-वडिलांना सांगितले नव्हते. ऑगस्ट २०२३ ते जानेवारी २०२४ कालावधीमध्ये पीडिता घरात कोणाशी बोलत नव्हती, कायम ती गप्प असायची. दरम्यानच्या कालावधीमध्ये पीडितेने क्रिएटिव्ह अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थिनींशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. तेव्हा सध्या परदेशात असलेल्या एका माजी विद्यार्थिनीने, मी देखील अशाच काही प्रकारांना सामोरे गेली आहे. मात्र, त्यावेळेस मी हे कुणाला सांगितले नाही. तू तुझ्या आई-वडिलांना हा सर्व प्रकार सांग जेणेकरून तुला न्याय मिळेल आणि यापुढे अन्य कुठल्या मुलीबरोबर असे घडणार नाही असे पीडितेला समजावले.

 

११ जानेवारी २०२४ रोजी पीडितेचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ते परत आल्यावर रात्री उशिरापर्यंत मुलगी जागी का आहे असे विचारल्यावर, पीडितेने रडत तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती आई-वडिलांना दिली. त्यांना सगळी हकीगत समजल्यावर हे पूर्ण कुटुंब मोठ्या तणावात होते. या धक्क्यातून सावरल्यावर पीडितेला घेऊन तिच्या आई-वडिलांनी थेट पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठले.

 

आयुक्तालयात आल्यावर पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मुलीबाबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी देखील या सगळ्या प्रकारानंतर क्रिएटिव्ह अकॅडमी येथे जाऊन नौशाद शेख आणि रागिणी पाटील हिला अटक केली. रागिणी पाटील ही सध्या पुण्यातील एका मोठ्या संस्थेत सहशास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे.

शेखला दहा वर्षांपूर्वीही झाली होती अटक..

शेख याच्या विरुद्ध अॅकॅडमीतील एका विद्या‌र्थिनीने ३० ऑक्टोबर २०१४ रोजी लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच अॅकॅडमीमध्ये शिकत असणाऱ्या इतर विद्यार्थिनींनीही असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. या घटनेच्या विरोधात शहरातील विविध महिला तसेच सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत शेखला अटक करण्याची मागणी केली. मात्र, तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. दरम्यान, त्यावेळेस शेख याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पुणे न्यायालयाने तेव्हा त्याचा अटकपूर्व जमीन फेटाळला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी (देहूरोड) त्याला अटक केली होती.

 

हा सगळा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी तपासासाठी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. शेख याचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये अश्लील साहित्य सापडले आहे. दहा वर्षांपूर्वी त्याने असाच गुन्हा केल्याने तो अटकेत होता. सर्व आजी-माजी विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

– स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button