राजधानीत थंडीचा तब्बल 119 वर्षांचा विक्रम मोडीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/cold-Frame-copy.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
गेल्या महिन्यात प्रदूषणाने त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना आता गारठ्याने हैराण केले आहे. नवी दिल्लीतील थंडीने सोमवारी (30 डिसेंबर) तब्बल 119 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. दिवसाचे कमाल तापमान 9.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले, तर सोमवारी 2.6 अंश सेल्सिअस एवढ्या नीचांक तापमानाची नोंद झाली आहे. दिल्ली धुक्यात हरवलेली आहे. तसेच दिल्लीतील दृश्यमानता शून्यावर आलेली आहे.दिल्लीत काही ठिकाणी पारा शून्य अंशांवर गेल्याचे दिसून आले आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 100 टक्के असल्याने कडाक्याच्या गारठ्याचा सामना दिल्लीकरांना करावा लागत आहे. पुढचे काही दिवस पारा घसरलेलाच राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
थंडीमुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीच्या काही भागांतही शनिवारी सकाळी तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांनी निवारागृहांकडे धाव घेतलेली आहे. राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्याखाली आलेला आहे. पिलानीमध्ये उणे 0.5 इतके तापमान नोंदविले गेले. फतेपूरमध्ये तापमान उणे 3 झाले होते.