राजकीय पक्षांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे: आयोगाचे आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/election-commission.jpg)
नवी दिल्ली: विविध निवडणुकांमधील ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या ( ईव्हीएम) वापराबाबत विविध राजकीय पक्षांकडून सतत आक्षेप नोंदवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर राजकीय पक्षांना ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. देशातील राजकीय पक्ष येत्या ३ जून पासून ईव्हीएम हॅक करून दाखवू शकतात असे आयोगाचे आयुक्त नसीम जैदी यांनी जाहीर केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित करून ही माहिती दिली आहे.
ईव्हीएम हॅक करण्यासाठी प्रत्येक पक्षाला ४ तासांची वेळ देण्यात येणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या तीन प्रतिनिधींना हॅकिंगसाठी परवानगी देण्यात येणार आहे. कोणताही राजकीय पक्ष आयोगाचे हे आव्हान स्वीकारू शकतो. राजकीय पक्षांना नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांमधील निवडणुकांतील कोणत्याही ४ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन मागवण्याची मूभा देण्यात आली आहे. आव्हान स्वीकारलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मशीनमध्ये केलेले मतदान कोणत्यातरी एका उमेदवाराच्या किंवा पक्षाच्या पारड्यात फिरवून दाखवावे असे थेट आव्हान आयोगाने राजकीय पक्षांना दिले आहे.
याबरोबर निवडणूक आयोगाच्या सुरक्षेत असलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून दाखवता येऊ शकतात असे सिद्ध करून दाखवण्याचे आवाहनही आयोगाने पक्षांना केले आहे.
ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते हा निव्वळ भ्रम असून ईव्हीएम कधीही हॅक केले जाऊ शकत नाही असे केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एका स्पष्ट केले आहे. ईव्हीएम रँडमायझेशनमुळे कोणत्या मशीन कोणत्या मतदारसंघात जाणार आहे याबाबच निवडणूक आयोगाला देखील काहीही माहिती नसते असेही निवडणूक आयोगाचे आयुक्त नसीम जैदी यांनी स्पष्ट केले आहे. ईव्हीएमबाबत आपले मत व्यक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सर्व शंकाकुशंकांचे निरसर करण्याचा प्रयत्न केला. या पत्रकार परिषदेत खास तयार करण्यात आलेला ५ मिनिटांचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला.