‘मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा’, पीडितेच्या वडिलांचा संताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/hinganghat.jpeg)
हिंगणघाट | महाईन्यूज
हिंगणघाटमधील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. माथेफिरू तरुणाने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं होते. हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतलेला आहे.
पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. ‘मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा’ असं म्हणत पीडित तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुलीला त्वरीत न्याय मिळाला पाहिजे अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या आहेत.’जो त्रास माझ्या मुलीला झाला तोच त्रास त्याला देखील झाला पाहिजे. मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. त्याला देखील जिवंत जाळा. निर्भयाच्या मारेकऱ्यांसारखं नको, लवकरात लवकर आरोपीला शिक्षा व्हावी’ असं पीडित तरुणीच्या वडिलांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ‘मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत’ असं पीडित तरुणीच्या आईने देखील म्हटलेलं आहे.