मिरवणुकीत तरुणाचा खून; एकाला अटक
औरंगाबाद | महाईन्यूज
शिवजयंतीच्या मिरवणुकीत झेंडय़ावरून झालेल्या किरकोळ वादातून श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय २१) या तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास हनुमान चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावर घडली. या प्रकरणी रात्री उशिरा मृत श्रीकांतचा भाऊ सूरज याच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना केली होती. त्यातून पोलिसांना विजय वैद्य हा आरोपी हाती लागला. तर दुसराही आरोपी अटक केल्याशिवाय श्रीकांतचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांची पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मृतदेह स्वीकारला आहे.
हुसेन कॉलनीत राहणारा मृत श्रीकांत हा गारखेडा परिसरातून निघणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सायंकाळी घरातून बाहेर पडला. मिरवणुकीत तो मोठा भगवा झेंडा हातात घेऊन फिरवत होता. त्याला विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य (रा. केंब्रिज चौक, चिकलठाणा) याने झेंडा फिरविण्यासाठी मागितला. मात्र, श्रीकांतने त्याला झेंडा द्यायला नकार दिला. त्यातून विजय ऊर्फ छोटू आणि राहुल भोसलेसोबत श्रीकांतचा वाद झाला. या वादातून विजय ऊर्फ छोटू आणि राहुलने श्रीकांतच्या छातीत चाकूने वार केला. यात श्रीकांत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच श्रीकांतच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर श्रीकांतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी राहुल भोसले याचाही ठावठिकाणा हाती लागला असून त्याला रात्रीपर्यंत अटक केलेली असेल, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले आहे.