मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
![Final hearing on Maratha reservation in Supreme Court from today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/suprim-court.jpg)
नवी दिल्ली – मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र या प्रकरणावर पाच दिवस आधी म्हणजेच आजपासून पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण पाच सदस्यीय घटनांपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. मात्र ९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता. तसेच २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र आजपासूनच या प्रकरणावर सुनावणी सुरू होत आहे.