ममता दीदी तुम्हाला कोलकात्याची जनता शत्रू का वाटते?, मोदींचा सवाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Narendra-Modi.jpg)
नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि भारतीय राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीचा विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्ला चढवलाय. बंगालच्या जनतेवर विश्वास ठेवा. इथल्या जनतेवर तुमचा विश्वास नाही का? तुम्हाला येथील जनता शत्रू का वाटते? असा थेट सवालचं मोदींनी ममता बॅनर्जींना केले. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करुन काँग्रेस राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचा आरोपही मोदींनी केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज ममता बॅनर्जी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कोलकाताहून थेट संयुक्त राष्ट्र संघात पोहचल्या आहेत. याच ममता दीदी काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधून येणाऱ्या शरणार्थ्यांना आपण मदत करायला हवी अशी भूमिका घ्यायच्या. तसेच त्यांनी संसदेत अध्यक्षांसमोर येऊन कागद फेकायच्या. मात्र आता याच ममता दीदी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत.’
तसेच ममतादीदी आता तुम्हाला काय झालं? तुम्ही का बदललात? तुम्ही अफवा का पसरवतं आहात?, ममतादीदी सत्ता येत आणि जाते मग तुम्हाला भीती कसली वाटते? असा प्रश्नार्थक टोला मोदींनी त्यांना लगावला. तुम्ही कोणाचे समर्थन करत आहात आणि कोणाला पाठिशी घालत आहात ते देशवासियांना समजते, असा टोलाही मोदींनी ममता बॅनर्जी यांना लगावला.