breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी लाच घेताना दोन अधिकारी जाळ्यात

कोल्हापूर । प्रतिनिधी

 पाझर तलावामध्ये मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी ताराबाई पार्कातील वारणानगर येथील मृदू व जलसंधारण विभागातील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना 18 हजाराची लाच घेताना आज अटक केली. जलसंधारण अधिकारी (वर्ग-2) शिवाजी हणमंत नेसरकर (रा.प्लॉट नं.15, निवारा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि कार्यकारी अभियंता (वर्ग-1) यशवंत लक्ष्मण थोरात (वय 55, दोघे सध्या रा.वारणा बंगला, सिंचन भवन जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर, मूळ रा. डी 2, गणेश गार्डन, बिबवेवाडी, पुणे 37) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज ही कारवाई केली. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की तक्रारदार हे मत्स्य व्यवसायिक आहेत. त्यांना पाझर तलावात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी पाझर तलावाची आवश्‍यकता होती. हे तलाव जलसंधारण विभागाकडे येत असल्यामुळे त्यांनी ते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कार्यकारी अभियंता यशवंत थोरात याला वीस हजार रुपये द्यावे लागतील, असे जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर याने सांगितले. हे शक्‍य नसल्यामुळे तक्रारदाराने नकार दिला. तेंव्हा तडजोडीने 18 हजार रुपये द्यावे, अशी मागणी केली. ही मागणी आज त्यांच्या कार्यालयात पूर्ण करण्यासाठी तक्रारदार गेले होते. तेथे दोघांनीही रंगेहात पकडले. 

सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार संजीव बंबर्गेकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलिस नाईक विकास माने, कॉस्टेबल मयूर देसाई व रुपेश माने यांचा सहभाग होता. 

नुकताच मत्स्य विभागातील सहाय्यक आयुकतांला महापुरातील नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी घेतलेल्या लाच प्रकरणी अटक केलेली घटना ताजी असताना आज ही घटना घटली. थेट वर्ग एक आणि दोनच्या दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्यामुळे लाच स्वीकारणाऱ्यांत आता अधिकारीच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. महिन्यापूर्वीच राजारामपुरी पोलिस ठाण्यातील डी.बी. शाखेतील प्रमुखालाच लाच घेताना अटक झाल्याची घटना आजही चर्चेत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button