भारताला पाक आणि चीन दोन्ही देशांच्या आघाड्यांवर युद्धाचा धोका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/army.jpg)
नवी दिल्ली: देशात सध्या चीनविरोधात तणाव सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यापासून सुरू झालेला चीनसोबतचा संघर्ष विविध पातळ्यांवर सुरूच आहे. आधीच अख्खं जग कोरोनासारख्या महासाथीशी सामना करीत आहे. त्यात भारताला चीनबरोबरच पाकिस्तानकडूनही धोका आहे. त्यामुळे सध्या भारताला या दोन्ही देशांकडून युद्धाचा धोका असल्याचे दिसून येत आहे. चिनी सैन्य आता लडाखमध्ये ऑप्टिकल फायबर केबल्सचे जाळे उभे करीत असल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका अधिक तीव्र झालेला आहे. या धोक्याने 17 वर्षाच्या उच्चांकाची नोंद गाठली आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानी सैन्याने सीमेवर 1 जानेवारी ते 7 सप्टेंबर या कालावधीत 3186 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केलेले असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमेवर या कालावधीत सीमापार गोळीबाराच्या 242 घटना घडल्या असल्याचीही नोंद या अहवालात करण्यात आलेली आहे.