बांधकाम प्रकल्प ठप्प; मार्चमध्ये शासनाकडून सर्वत्र अंमलबजावणी होण्याची शक्यता
सांगली | राज्यातील सर्वच शहरांमध्ये समान बांधकाम नियमावली लागू करण्याचे प्रयत्न राज्यातील नव्या सरकारकडून सुरू असल्यामुळे या नियमावलीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील सहाशे चौरस फुटांवरील सुमारे ८० टक्के प्रकल्प ठप्प झाले आहेत. मार्चमध्ये नियमावली लागू होण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांना आहे.
जिल्ह्यासह राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना गेल्या काही दिवसांपासून अनेकप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिराबरोबरच बांधकाम नियमावली, करप्रणालीच्या कटकटींना सामोरे जावे लागत होते. बांधकाम व्यावसायिकांनी सातत्याने या व्यवसायात सुटसुटीतपणा यावा, व्यावसायिक व ग्राहक यांचे हित साधले जावे म्हणून अपेक्षित नियमावली करण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा केला. क्रेडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेने अनेकदा मंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत आग्रह धरला होता.
डिसेंबर २०१९ मध्ये सांगली जिल्ह्यात जेवढे मोठे प्रकल्प सुरू होते, ते आता थांबविण्यात आले असून, नव्याने नियोजित केलेल्या बांधकामांनाही पुढे ढकलण्यात आले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात बांधकाम नियमावली वेगळ््या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना, बांधकाम व्यावसायिकांना या नियमावल्यांचा त्रास होतो. त्यामुळेच ग्रामपंचायतीपासून महापालिकांपर्यंत एकच बांधकाम नियमावली व्हायला हवी, अशी मागणी जोर धरू लागली.