फ्लोरिडा, टेक्सासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची बाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/trump-bayden.jpg)
वॉशिंग्टन – कोरोना संकटात संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार की डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन इतिहास रचणार, हे आज ठरणार आहे. मंगळवारी मतदान झाल्यानंतर आज सर्व 50 राज्यांमध्ये मतमोजणी पार पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे या अटीतटीच्या लढतीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फ्लोरिडा आणि टेक्सास या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्राध्यक्षपद कायम राखण्यासाठी ट्रम्प यांना फ्लोरिडामध्ये विजय अत्यंत आवश्यक होता. फ्लोरिडामध्ये एकूण २९ इलेक्टोरल वोट्स आहेत.
दरम्यान, २००० सालापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराने फ्लोरिडामध्ये विजय मिळवला, त्यानेच पुढे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. फ्लोरिडाशिवाय कुठल्याही रिपब्लिकन उमेदवाराला व्हाइट हाऊसची शर्यत जिंकता आलेली नाही. २०१६ मध्ये ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर फ्लोरिडात फक्त एक टक्का मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
विशेष म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वयोवृद्ध उमेदवारांमध्ये निवडणूक लढत होत आहे. व्हाईट हाऊसवर दुसऱ्यांदा कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले डोनाल्ड ट्रम्प हे 74 वर्षांचे आहेत, तर त्यांचे विरोधक ज्यो बायडेन हे 77 वर्षांचे आहेत. त्यामुळे अमेरिकेला आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे. दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.