फ्रान्समध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर होताच रस्त्यावर ७०० किमीच्या वाहनांच्या रांगा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/France-Traffic.jpg)
पॅरीस – एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे नुकताच झालेला दहशतवादी हल्ला यामुळे फ्रान्समध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा याकरता हा लॉकडाऊन करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील ६.७ कोटी लोक डिसेंबरपर्यंत बंधनात राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सायंकाळापासूनच पॅरिस आणि आजूबाजूच्या परिसारत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
एपीने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिसमध्ये आणि आसपास असणाऱ्या परिसरातील वाहतूक कोंडी किमीमध्ये मोजल्यास जवळपास ७०० किमी लांब वाहतूक कोंडी झाली होती. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हा लॉकडाउन एक महिन्यांसाठी लागू असणार आहे. यामुळेच गुरुवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन प्रभावी होण्याआधी सामान खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. याशिवाय विकेण्ड आल्यानेही अनेक लोक इतर ठिकाणी असणाऱ्या आपल्या घऱी जाण्यासाठी निघाले होते. यामुळेच ही स्थिती निर्माण झाली होती.
फ्रान्समध्ये २४ तासांत कोरोनाचे ४७ हजार ६३७ रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १३ लाख २७ हजार ८५२ इतकी झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३६ हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान लॉकडाउनदरम्यान जे लोक घरुन काम करु शकत नाहीत त्यांना कामासाठी बाहेर जाण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी तसंच वैद्यकीय कारण आणि व्यायामासाठी एक तासासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास सांगण्यात आलं आहे. तर बार, कॅफे, जिम आणि रेस्तराँसहित अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकानं बंद असणार आहेत.