फिर्यादी नायब तहसीदाराच निघाला आरोपी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/gevarai-bhandare.jpg)
बीड | रेशनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा बीड जिल्ह्यातील गेवराई येथे काही दिवसांपूर्वी पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या फिर्यादीवरून भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. फिर्याद देणारा नायब तहसीलदार अशोक भंडारे हाच आरोपी निघाला आहे. आरोपीच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गेवराई तालुक्यातील कोट्यवधींच्या धान्य घोटाळा प्रकरणात मूळ फिर्यादी असलेल्या नायब तहसीलदार अशोक भंडारे याला पोलिसांनी अटक केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गेवराई तालुक्यात एका भाजप कार्यकर्त्याच्या गोदामावर छापा टाकला होता. पोलिसांनी कोट्यवधीचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा घोटाळा उघडकीस आणला होता. यात तपासादरम्यान एका गोदामपालला अटक करण्यात आली होती. मात्र, गुन्ह्याची पाळेमुळे पुरवठा विभागात असल्याने विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
आता या प्रकरणात फिर्यादी असलेल्या नायब तहसीलदार अशोक भंडारे याची कसून चौकशी केली असता त्याचं पितळ उघडं पडलं. अखेर शुक्रवारी पोलिसांनी आरोपी नायब तहसीलदार अशोक भंडारे याला अटक केल्याची माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख तथा पोलिस उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे.