पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो : कैलाश विजयवर्गीय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Vijaywargi.jpg)
भोपाळ | पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांग्लादेशी घुसखोर ओळखतो, असा अजब दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचंही विजयवर्गीयांनी समर्थन केलं. इंदौरमध्ये एका सभेला ते संबोधित करत होते.
‘मजुरांच्या पोहे खाण्याच्या शैलीवरुन मला समजलं की ते बांग्लादेशी आहेत. मी मजुरांशी बोललो, तेव्हा ते पश्चिम बंगालच्या कोणत्या जिल्ह्यात किंवा खेड्यात राहतात हेदेखील सांगू शकले नव्हते’ असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
‘सेवा सुरभी’च्या कार्यक्रमात गुरुवारी कैलाश विजयवर्गीय सुधारित नागरिकत्व कायद्यावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. ‘काही दिवसांपूर्वी माझ्या घरात काम सुरु असताना काही मजूर विचित्र पद्धतीने पोहे खाताना मला दिसले. ते कच्चे पोहे खात होते. मी त्यांच्या सुपरवायझरशी बोललो. ते बांग्लादेशी आहेत का? असं मी त्याला विचारलं. दोन दिवसांनंतर त्यातला एकही मजूर कामावर आला नाही’, असं विजयवर्गीयांनी सांगितलं.
एक बांग्लादेशी तरुण दीड वर्ष इंदौरच्या आझाद नगर भागात राहत होता आणि माझी ‘रेकी’ करत होता. त्याच्या अटकेनंतर या गोष्टीचा खुलासा झाला, त्यामुळे माझ्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली, असंही विजयवर्गीय म्हणाले.