पाकिस्तानी, बांगलादेशींची माहिती देणा-याला मिळणार इनाम, मनसेची नवीन मोहीम
औरंगाबाद | महाईन्यूज
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी मनसेने सुरू केलेल्या धाडसत्रानंतर आता आणखी एक शक्कल पक्षाने लढविली आहे. घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना औरंगाबादमधील मनसेकडून घसघशीत इनाम देण्यात येणार आहे.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तींना पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती मनसेकडून पोलिसांना दिली जाणार आहे. पोलीस त्याठिकाणी जाऊन नागरिकांचे नागरिकत्वाचे पुरावे तपासतील. तसेच, पोलीस पुढील कारवाई देखील करतील.
औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. त्याद्वारे घुसखोरांविषयी माहिती घेण्यात येणार आहे. माहिती देणा-याचे नाव व पत्ता गुप्त ठेवण्यात येणार आहे. माहिती खरी ठरल्यास संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा औरंगाबाद मनसेकडून करण्यात आली आहे.





