पाकिस्तानात भीषण विमान अपघात, कराची एअरपोर्ट जवळ प्रवासी विमान कोसळलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/pakistan-plane-crash.jpg)
पाकिस्तानात भीषण विमान अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान लँडिंग करताना रहिवाशी भागात कोसळले. लँडिंगला फक्त एक मिनिट उरले असताना कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. पीआयए एअरबस ए ३२० प्रकारातील हे विमान आहे.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार या विमानात ८५ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स असे एकूण ९७ जण होते. करोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येत आहेत, त्यामुळे प्रवासी संख्या कमी होती असे पाकिस्तानातील एका पत्रकाराने आजतक वाहिनीवर बोलताना सांगितले.
Pakistan International Airlines (PIA) flight from Lahore to Karachi crashes near Karachi Airport: Pakistan media pic.twitter.com/jyDTkoQ2nf
— ANI (@ANI) May 22, 2020
मॉडेल कॉलनी जवळच्या जिना गार्डन भागात हे विमान कोसळले. टीव्हीवरील दृश्यांमध्ये रहिवाशी इमारतींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे तसेच घटनास्थळावर आग लागली असून धुराचे लोळ उठताना दिसत आहे. नेमकी जिवीतहानी किती झाली ते पाकिस्तानी यंत्रणेने अजून स्पष्ट केलेले नाही. पण अपघातस्थळी गोंधळ आणि भितीचे वातावरण आहे.
लँडिंगच्या मिनिटभरआधी या विमानाशी संपर्क तुटल्याचे पाकिस्तानातील सीएएकडून सांगण्यात आले. स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स आणि पाकिस्तानी लष्करच्या तात्काळ कृती दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. विमानतळाजवळचा परिसर अरुंद गल्ल्यांचा आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला मदतकार्य करताना अडथळे येत आहेत.