पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तीन दिवसांचे लॉकडाऊन
कोलकाता – पश्चिम बंगालमधील करोना स्थिती आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने 7,11,12 असे तीन दिवस लॉकडाऊन घोषित केले आहे. तथापि अनेक ठिकाणी लोकांनी हा लॉकडाऊन झुगारून दिल्याचा प्रकार घडला आहे.
कोलकात्यात लोकांनी बहुतांशी हा लॉकडाऊन पाळला असला तरी त्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागला. लॉकडाऊन नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कोलकात्यात करण्यात आली. पुरूलिया, दक्षिण 24 परगणा, माल्डा आणि अन्य जिल्ह्यात लोकांनी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन झुगारून दिल्याचे दिसून आले. तेथे मार्केट आणि दुकाने सर्रास सुरू होती. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसुली केली.
केंद्र सरकारकडून सध्या अनलॉकिंग 4 ची प्रक्रिया सुरू आहे. पण त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर टीका केली होती. केंद्र सरकार केवळ वरून आदेश जारी करून निवांत बसत आहे. तथापि राज्य सरकारांना त्याची अंमलबजावणी करावी लागत असल्याने राज्य सरकारांना विश्वासात घेऊन अशा स्वरूपाच्या उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते.
करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यव्यापी तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.