पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण: मुख्य आरोपी देवडीकरला १५ दिवसांची पोलीस कोठडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/gauri-lankesh-murdere.jpg)
कर्नाटक | महाईन्यूज
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर याला कर्नाटकातील कोर्टाने १५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. कर्नाटकातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी (दि.१०) त्याला अटक केली होती. मूळच्या औरंगाबादच्या असलेल्या देवडीकरला एसआयटीने झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरास येथून बेड्या ठोकलेल्या आहेत. ऋषिकेश गेल्या अनेक दिवसांपासून फरार आरोपी होता.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता, याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केलेली होती. तीन हल्लेखोरांनी लंकेश यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला होता.