नाहीतर आमचंही लिंचिंग झालं असतं! ACP नीं सांगितला तो धक्कादायक प्रसंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/anuj-kumar.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीदरम्यान दंगेखोरांनी सर्वसामान्य आणि सार्वजनिक मालमत्तेसोबतच पोलिसांनाही लक्ष्य केले आहे. या दंगलीत पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, ही दंगल आटोक्यात आणताना गंभीर जखमी झालेले एसीपी अनुज कुमार यांनी आपल्यावर ओढवलेला भयावह प्रसंग कथन केलेला आहे.
दिल्लीत उसळलेल्या दंगलीदरम्या्न गोकुलपुरीचे एसीपी अनुज कुमार गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, आयसीयूतून बाहेर आल्यानंतर सामाजमाध्यमांशी संवाद साधताना त्या दिवशी जमाव कसा नियंत्रणाबाहेर गेला हे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘दंगलीदरम्यान मृत्यू झालेले पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल हे सुद्धा माझ्यासोबत होते. रतनलाल यांना दगड लागला असावा, असे सुरुवातीला वाटले. मात्र त्यांना गोळी लागल्याने नंतर निदर्शनास आले. शाहदराचे डीसीपी अमित शर्मा हेसुद्धा यावेळी जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. त्यांच्या तोंडातून रक्त येत होते. त्यांना उचलून आम्ही डिव्हायडरच्या पलिकडे गेलो. ‘24 फेब्रुवारीच्या सकाळी ११ ते ११.३० च्या सुमाराची वेळ असेल. डीसीपी अमित शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासोबत मी चांदबाग मजारपासून १०० मीटर अंतरावर तैनात होतो. २३ तारखेला वजिराबाद रोड आंदोलकांनी बंद केला होता. खूप प्रयत्नांनंतर हा रस्ता मोकळा करण्यात आला होता. आंदोलकांना सर्विस रोडवर रोखून मुख्य रस्ता मोकळा ठेवायचा असे आदेश होते. त्यामुळे तिथे सुरक्षा दलांच्या दोन कंपन्या आणि अधिकारी उपस्थित होते.’असे अनुज कुमार यांनी सांगितले आहे.
‘पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असतानाचा दगडफेकीचे वृत्त पसरले. त्यानंतर तिथे जमाव जमण्यास सुरुवात झाली. त्यात महिलांचाही समावेश होता. या जमावाला सर्विस रोडवर थांबण्याचे आवाहन करूनही हा जमाव तिथे थांबण्यास तयार नव्हता. तेवढ्यात पोलिसांनी गोळीबार केल्याची अफवा पसरली. त्यानंतर तिथे जमावाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये फार अंतर राहिले नव्हते. ‘तेवढ्यात कुणीतरी एक दगड फेकला असता त्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेकीस सुरुवात झाली. अश्रुधुरांच्या कांड्या फोडूनही काही उपयोग होत नव्हता. पाच दहा मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आल्यावर मी पाहिले तर डीसीपी गंभीर जखमी होऊन डिव्हायडरजवळ पडले होते. त्यांच्या तोंडातून रक्त येत होते. त्यांना उचलून आम्ही डिव्हायडरच्या पलिकडे गेलो. जमाव उग्र झाला होता. त्यामुळे तिथून माघार घेणेच आम्ही योग्य समजले. आम्ही यमुना विहारच्या दिशेने गेलो. जर आम्ही सरळ गेलो असतो तर कदाचित जमावानं आमचंही लिंचिंग केलं असतं.’असे एसीपी अनुज कुमार यांनी सांगितले आहे.