नाशिकमध्ये प्लाझ्मा संकलन सुरू करा – पालकमंत्री छगन भुजबळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/chagan.jpg)
कोरोना संसर्ग पूर्णपणे रोखण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे. शासकीय लॅबसह शहरात प्लाझ्मा संकलनाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये कोरोनाचा मृत्युदर कमी असून राज्यात जिल्हा १२व्या क्रमांकावर आहे. जिल्हा बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये ५व्या, तर रुग्णसंख्येबाबत ७व्या क्रमांकावर आहे. हा आकडा शून्यावर येईपर्यंत आपण प्रयत्नशील राहू.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसतेय; परंतु या माध्यमातून वेळीच बाधितांपर्यंत पोहोचून त्याला गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यापासून होणाऱ्या संभाव्य संसर्गाला नियंत्रणात आणले जात आहे. जिल्हा रुग्णालयात सरकारी लॅब र्नििमतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शहरात इतर लॅबना परवाने देऊन कोरोनावरील उपचारांसाठी भविष्यात प्लाझ्मा संकलनाचेही काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात ३५०, एसएमबीटी कॉलेज येथे १०० बेड उपलब्ध होण्याचे नियोजन तत्काळ करावे, महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये अतिरिक्त मनुष्यबळासाठी तत्काळ भरती करण्यात यावी, आयएमएच्या डॉक्टरांचीही मदत घेण्यात यावी.
या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी उपाययोजना व भविष्यातील नियोजनाची दिशा स्पष्ट केली.