नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न
![Bhumi Pujan of construction of new Parliament building was held by Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/sansad-bhavan.jpg)
नवी दिल्ली – टाटा प्रोजेक्ट लिमिटेड बांधत असलेल्या नवीन संसद भवनाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडले. विविध धर्मांतील धर्मगुरूंनी येथे उपस्थित राहून संसद भवनासाठी प्रार्थना केली. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती होती. जुन्या संसद भवनात जागेची कमतरता आणि भविष्याच्या दृष्टीने मर्यादा असल्याने नवी इमारत उभारण्यात येत आहे. नवी संसद इमारत त्रिकोणी रचनेत असेल. सध्याच्या राष्ट्रपती भवनापासून थेट इंडिया गेटपर्यंत 3 किलोमीटर परिसरात राजपथाच्या दोन्ही बाजूला इमारती उभारल्या जाणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे संसदेच्या पुनर्बाधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच केंद्राने नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना न्यायालयाने नव्या संसद भवनाचे भूमिपूजन करण्यास काही हरकत नसल्याचे सांगितले, मात्र न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये कोणतेही बांधकाम पाडणे किंवा उभारणे, प्रकल्पाच्या जागेवर वृक्षतोड करणे या सर्व गोष्टींना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भूमीपूजनानंतर लगेचच संसदेच्या नव्या इमारतीचे काम सुरू होऊ शकणार नाही.
वाचा :-सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी – रमेश पोखरियाल
दरम्यान, नव्या संसद भवनात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त अधिवेशन आयोजित करता यावा यासाठी 2022पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची सरकारची तयारी आहे. नवीन संसद भवनाची रचना एचसीपी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली असून या भवनात लोकसभेचा आकार आता असलेल्या सभागृहाच्या तुलनेने तिप्पट अधिक असेल. इतकेच नाही तर राज्यसभेचा आकारही मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडून एकूण 64,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये नवीन संसदेची इमारत बांधली जाणार आहे.
नव्या संसद भवनाची वैशिष्ट्ये
- नवे संसद भवन गोल नव्हे त्रिकोणी आकाराचे
- संसद भवनाचे बांधकाम स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी अर्थात ऑगस्ट 2022पर्यंत पूर्ण
- संसद भवनाला 861.90 कोटी रुपयांचा खर्च
- केंद्रीय सचिवालय 2024पर्यंत तयार होणार
- लोकसभा-राज्यसभेतील रचना महाराष्ट्र विधानसभेसारखी
- 64,500 स्क्वे.मी. अंतरावर असेल संसद भवन
- बांधकामात 2 हजार प्रत्यक्ष, 9 हजार अप्रत्यक्ष कारागीर
- एकूण 1,272 खासदार एकाच वेळी बसण्याची क्षमता
- लोकसभेत 888 व राज्यसभेत 384 खासदार बसू शकणार
- नव्या संसदेत सध्यापेक्षा 488 जादा खासदार बसू शकणार
- नव्या संसद भवन परिसरात प्रत्येक खासदाराचे कार्यालय
सेंट्रल विस्ताची वैशिष्ट्ये
- एकूण बांधकाम 18.37 स्क्वे.कि.मी. भागात
- सेंट्रल विस्ता प्रोजेक्टचा एकूण खर्च 11,794 कोटी रुपये
- किमान 6 वर्षे काम चालत राहील
- सेंट्रल विस्ताममध्ये एकूण 14 इमारती असतील
सेंट्रल विस्ता प्रोजेक्टमध्ये काय काय आहे?
- एकूण 14 इमारती
- संसद भवन
- केंद्रीय सचिवालय
- विविध खात्यांची कार्यालये
- विविध खात्यांचे केंद्रीय विभाग
- कॉन्फरन्स सेंटर