धक्कादायक! बहिणीची छेड काढल्यावरून युवकाचा खून
![Corporator Sandeep Pawar arrests two absconding accused in murder case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/831526-murder-picture-for-representation-file-photo.jpg)
नागपूर: बहिणीची वारंवार छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमीयोचा दोघांनी चाकूने भोसकून खात्मा केलेला आहे. ही थरारक घटना रविवारी रात्री आठ वाजता उप्पलवाडी परिसरात घडली. गोलू उर्फ दीपक देशराज राजपूत (२६, रा. कडू ले-आऊट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हत्याकांडातील दोन्ही आरोपींना कपिलनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीत गुन्हेगारांनी पुन्हा डोकेवर काढलेले आहे. रात्र होताच गुन्हेगार सक्रिय होत अनेक गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. कपिलनगरातील हत्याकांडात गोलू राजपूत हा कुख्यात असून तो वस्तीत दादागिरी करतो. तो नेहमी वस्तीतील तरुणी आणि महिलांची छेडखानी करण्याच्या सवयीचा होता.
गेल्या काही दिवसांपासून तो आरोपी तक्षशीलानगरातील तुषार गजभिये (२४) याच्या बहिणीला त्रास देत होता. टोमणे मारणे किंवी शेरेबाजी करीत होता. ही बाब बहिणीने भाऊ तुषारला सांगितली होती. त्यामुळे त्याचा पारा चढलेला आहे. त्याने गोलू राजपूतचा थेट काटा काढण्याचा प्लानिंग केला. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोलू राजपूत उप्पलवाडी परिसरात दिसला. आरोपी तुषार गजभिये आणि टोनी उर्फ प्रेम मारोतकर (२३, रा. स्वामीनगर, नारी रोड) याला फोन केला. दोघेही उप्पलवाडीत पोहोचले. गोलूला रस्त्यातच गाठले. त्याला पकडून विटा भट्टीकडे नेले. तेथे अंधारात गोलूवर तलवार आणि चाकूने सपासप वार करीत ठार केले आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे.