दहशतवाद्यांविरुद्ध लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मूमध्ये वीरमरण
एकीकडे संपूर्ण जग करोना विषाणूशी लढा देत असताना, सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया काही केल्या कमी होत नाहीयेत. जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात शनिवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPF च्या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. प्रत्युत्तरदाखल सुरक्षा पथकाने केलेल्या गोळीबारात जैश ए मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे.
येथील नूरबाग परिसरात जम्मू-कश्मीर पोलीस व सीआरपीएफचे संयुक्त पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. दहशतावदी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक झाली. यामध्ये हेड कॉन्स्टेबल राजीव शर्मा, कॉन्स्टेबल सी. बी. भाकरे तसेच कॉन्स्टेबल सत्पाल परमार शहीद झाले. दोघे जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोपोरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहीद झालेल्यातील कॉन्स्टेबल सी. बी. भाकरे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे सुपुत्र आहेत. राजीव शर्मा हे बिहारमधील वैशालीचे तर परमार हे गुजरातेतील साबरकांठा येथील आहेत.
“संध्याकाळी नाकाबंदी सुरु असताना आमच्या पथकावर अतिरेक्यांनी अचानक गोळीबार केला, आम्ही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र या घटनेत आमचे ३ जवान शहीद झाले आहेत.” CRPF च्या जम्मू-काश्मीर विभागाचे विशेष संचालक झुल्फीकार हसन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली. या घटनेत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या आठवड्याभरात भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात CRPF चा एक जवान जखमी झाला होता. शुक्रवारी, चार अतिरेकी काश्मीरमध्ये शिरले होते, त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आलं आहे.