तेजस्वी यादवांमुळे नाही, कोरोनामुळे आमचा पराभव – जेडीयू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/kc-tyagi.jpg)
पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाने पराभव मान्य केला आहे. मात्र ‘तेजस्वी यादवांमुळे नव्हे तर कोरोनामुळे आमचा पराभव झालाय’, असा अजब दावा जेडीयूने केलाय. त्यामुळे जेडीयूच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जेडीयूचे महासचिव केसी त्यागी यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘आम्हाला आमचा पराभव मान्य आहे. आम्हाला नैसर्गिक आपत्तीने पराभूत केले आहे. नितीशकुमार नावाचा ब्रँड बिहारमधून गायब झालेला नाही आणि तेजस्वी यादवही नेते म्हणून इस्टॅब्लिश झालेले नाहीत. कोरोनामुळे लोकांची नकारात्मक मानसिकता तयार झाली. त्यामुळे आमचा पराभव झाला. राजदमुळे नाही’, असे त्यागी यांनी सांगितले.
दरम्यान, आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील महागठबंधनने अनेक मतदारसंघांत मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपाप्रणित एनडीए आणि महागठबंधनमधील अंतर बरंच कमी झालं आहे. महागठबंधन आणि एनडीएमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. तर भाजपा आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा जेडीयूपेक्षा बराच पुढे आहे. जेडीयूच्या खराब प्रदर्शनाचा एनडीएला फटका बसला आहे. आता नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे.