ज्योतिरादित्य शिंदे-कमलनाथ यांच्यातील वाद सोनिया गांधींकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Kamalnath.jpg)
नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे गटात सध्या तीव्र मतभेद सुरु असल्याचे दिसत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी शिक्षकांच्या समर्थनात आपल्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. जाहीरनामा हा पाच महिन्यांसाठी नव्हे तर पाच वर्षांसाठी असतो, अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली. इतक्यावरच न थांबता कमलनाथ यांनी शुक्रवारी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली.
आज मध्य प्रदेश काँग्रेस समन्वय समितीची बैठक होत आहे. बैठकीत कमलनाथ यांच्याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, दीपक बाबरिया, मीनाक्षी नटराजन आणि जीतू पटवारी सहभागी होणार आहेत.
शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान कमलनाथ यांनी शिंदेंकडून सातत्याने राज्य सरकारवर करण्यात येत असलेल्या टीकेवरुन नाराजी जाहीर केली. कमलनाथ म्हणाले की, मी पक्षाध्यक्षांना आपले सरकार राज्यात वचनपत्रातील आश्वासने पूर्ण करण्यात किती सक्षम आहे, हे सांगितले. या दरम्यान, पंचायत निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि संघटनेच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
ज्योदिरादित्य यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, वचनपत्र पाच वर्षांसाठी असते, पाच महिन्यांसाठी नाही, असा टोलाही लगावला.