जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही; राहुल गांधींचा एल्गार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/rahul-gandhi.jpg)
नवी दिल्ली | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात रोखून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती.
राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार आहेत. त्याबाबत इशारा देताना राहुल गांधी म्हणाले, जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून, त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, पीडित मुलीच्या परिवाराशी यूपी पोलीस व यूपी सरकार ज्या प्रकारचं वर्तन करत आहे, ते मला मान्य नाही. कोणत्याही भारतीयाने ती स्वीकारु नये.
अशी माहिती मिळाली आहे की, राहुल गांधी आज दुपारी हाथरसला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदारदेखील असतील. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करेल. या सरकारने पीडितेच्या कुटुंबाला न्यायापासून वंचित ठेवलं आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच हे सरकार पोलीस बळाचा वापर करुन मीडियालादेखील पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही.