चीनच्या श्वेतपत्रिकेत स्वत:लाच निर्दोषत्व!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coro1588135147764.jpg)
बीजिंग : करोना साथीवर चीनने एक श्वेतपत्रिका जारी केली असून त्यात स्वत:ला विषाणूबाबत माहिती लपवून करोनाची साथ जागतिक पातळीवर पसरण्यास अप्रत्यक्षपणे हातभार लावल्याच्या जागतिक आरोपातून दोषमुक्त केले आहे.
हा विषाणू २७ डिसेंबरला वुहानमध्ये सापडला. त्यातून निर्माण होणाऱ्या आजाराचे स्वरूप विषाणूजन्य न्यूमोनिया असे होते, नंतर तो माणसातून माणसात पसरत असल्याचे १९ जानेवारीला निदर्शनास आले त्यानंतर चीनने लगेच या विषाणूला काबूत आणण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या, त्याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकेलाही वेळेत दिली ,असे चीनने म्हटले आहे.
चीनने माहिती पुरवण्यात दिरंगाई केल्यानेच हा विषाणू जगभरात पसरल्याच्या आरोपावर चीन सरकारने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे,की वुहानमधील विषाणूची माहिती आम्ही वेळीच दिली होती. २७ डिसेंबरला हा विषाणू वुहानमध्ये सापडला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने रुग्णांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावले होते. त्यांनी हा विषाणूजन्य न्यूमोनिया असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य आयोगाने कोविड १९ विषाणू माणसातून माणसात पसरत असल्याचे १९ जानेवारीला जाहीर केले होते. त्यानंतर लगेच लोकांना सतर्क करण्यात आले होते. १९ जानेवारीच्या आधी हा विषाणू माणसातून माणसात पसरत असल्याचे कुठलेही पुरावे नव्हते असे चीनचे श्वसन रोग तज्ज्ञ वँग ग्वांगफा यांचे मत आहे. त्यानंतर पुन्हा तज्ज्ञ लोक वुहानमध्ये आले असता तापाचे अनेक रुग्ण तेथे होते.त्या लोकांचा वुहानमधील प्राण्यांच्या बाजारपेठेशी काही संबंध नव्हता. वटवाघळे व खवलेमांजर हे प्राणी विषाणूचे मध्यस्थ यजमान असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्याचे पुरेसे पुरावे नाहीत. चीनमधील श्वसन रोग तज्ज्ञ झोंग नानशान यांनी हा विषाणू माणसातून माणसात पसरत असल्याचे २० जानेवारीला स्पष्ट केले होते. वुहान शहर व हुबेई प्रांतात अज्ञात कारणाने न्यूमोनिया होत असल्याचे दिसून आल्यानंतर चीनने साथरोग शास्त्रीय तपास केला. त्यानंतर याची माहिती जागतिक आरोग्य संघटना व अमेरिका यांना देण्यात आली होती. विषाणूचा जनुकीय आराखडाही या देशांना देण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी अद्ययावत माहिती जाहीर करण्यात आली. त्यानंतरच्या काळातही चीनने जगातील अनेक देशांना कोटयवधी मुखपट्टय़ा व पीपीइ संच पुरवून मदत केली होती.