‘चार दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर इंदोरीकर महाराजांना काळं फासणार’- तृप्ती देसाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/TRUPTI-DESAI.jpeg)
अहमदनगर | महाईन्यूज
गर्भलिंग निदान वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेले कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात भूमाता ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. येत्या चार दिवसात इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर अकोला येथे जाऊन त्यांना महिला कार्यकर्त्या काळे फासतील असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलेला आहे.
याबाबत बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना इंदोरीकर महाराजांबाबत जाब विचारला जाईल. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या संदर्भात भूमाता ब्रिगेडकडून मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
दरम्यान, खुद्द इंदोरीकर महाराजांनी माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोलले आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.