कोरोनावरील लस म्हणजे जादूची गोळी नाही! WHOचा इशारा
![# Covid-19: Private vaccination still closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/vaccine-1.jpg)
नवी दिल्ली – जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येने सहा कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोनावरील लस म्हणजे जादूची गोळी नाही, लस विकसित झाली म्हणजे आता कोरोना पूर्णपणे नष्ट होईल असे नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
वाचा:- #Covid-19: भारतामध्ये 140 दिवसांनंतर अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा कमी
कोरोनावर लस विकसित झाल्यानंतर ती आपल्या मेडिकल किटमधील एक प्रमुख शक्तिशाली उपकरण असणार आहे. मात्र लस संपूर्णपणे कोरोना नष्ट करेल असे होणार नसल्याचे WHOच्या मायकल रेयान यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाची लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला सर्वांनाच उपलब्ध होणार नसल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.
तर ‘कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही’, असे विधान जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी केले आहे. अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी कोरोना लस ही तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यांचे परिणाम पाहिले तर आता आपण कोरोना महामारी संपेल असे स्वप्न पाहण्यास हरकत नाही, असे मत टेड्रोस यांनी मांडले आहे. तसेच प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कोरोनावरील लस आल्यानंतर सावध राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.