कोरोनाच्या सावटामुळे यंदा कोकणातील वाडय़ा-वस्त्यांवर तणावाचं वातावरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/ganesh-festival-202007459987_20200788158.jpg)
कोरोनाच्या अभूतपूर्व सावटामुळे यंदा कोकणातील वाडय़ा-वस्त्यांवर विचित्र तणावाच वातावरण आहे. यंदा गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु आहेच मात्र नेहमीसारखा उत्साह आणि आनंद मात्र कुठेतरी हरवल्यासारखा आहे.
कोकणात गणेशोत्सवाचे स्वरूप फारसे ‘सार्वजनिक’ नसते. येथे श्रीगणेशाची घरोघर भक्तीभावाने प्रतिष्ठापना करून पाच किंवा सात दिवसांनी गौरीसह विसर्जन केले जाते. या सुमारे आठवडाभराच्या काळात वाडय़ा-वस्त्यांवर सामूहिक आरत्या, भजने, जाखडी नाच अशी नुसती धमाल चाललेली असते. या निमित्ताने पुण्या-मुंबईहून आलेले नोकरदार गावचे नातेवाईक आणि जुन्या सवंगडय़ांसह उत्सवाचा आनंद लुटतात. हा एक प्रकारचा धार्मिक-सांस्कृतिक-कौटुंबिक सोहळा असतो. पण करोनामुळे यंदा हे वातातवरण पूर्णपणे बदलल आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या मंडळींबरोबर हा घातक ‘पाहुणा’ येऊ नये म्हणून आरोग्य तपासणी आणि १० दिवसांच्या विलगीकरणच्या अटीमुळे अनेकांनी यंदा या उत्सवाकडे आपणहून पाठ फिरवली आहे. आहे आणि कोकणात जाणच टाळलं आहे. काहीजणांनी यंदाच्या वर्षी ही जबाबदारी स्थानिक भाऊबंद किंवा कौंटुंबिक संबंध असलेल्या ग्रामस्थांवर सोपवली आहे, तर अन्य काहीजणांनी या वर्षांपुरते गणरायाचे स्वागत पुण्या-मुंबईतील सध्याच्या घरातच करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील गावांमध्ये गणपती आणणाऱ्यांनाही सामूहिक आरती-भजने, नाच इत्यादीला फाटा देऊन ‘शासकीय मार्गदर्शक तत्त्वानुसार’ बाप्पाचे आगत-स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे या उत्सवाचा अस्सल कोकणी बाजच हरपणार आहे.
बाजारपेठांमध्येही हवी तशी गर्दी पहायला मिळत नाहीये. अर्थात असे असले तरी दरवर्षीचा उत्साह नसल्यामुळे येथील बाजारपेठांवर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. एरवी या दिवसात फुलून जाणाऱ्या बाजारांमध्ये उत्सव इतका जवळ आला असूनही म्हणावी तशी गर्दी आणि उलाढाल पहायला मिळत नाही. एरवी उत्सवापूर्वी या शहरामध्ये भरपूर काम करून थोडे जास्त पैसे गाठीला बांधायचे आणि गावी येऊन ‘गणपती सण’ दणक्यात साजरा करायचा, हा कोकणी माणसाचा पिढय़ानपिढय़ांचा रिवाज. पण यंदा दीर्घ काळ चाललेल्या टाळेबंदीने ही संधी हिरावून घेतली. त्यामुळे यावर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना, असा उत्सव पुन्हा न होवो, एवढे एकच गाऱ्हाणे कोकणी माणूस घालणार आहे.