कोरोनाच्या भितीमुळे जगभरातील ‘अभिवादनाच्या’ सवयींमध्ये बदल
कोरोनामुळे उद्योगधंदे, अर्थव्यवस्था हवामानच नाही तर लोकांच्या सवयीतही काही बदल झाले आहेत. कोरोनामुळे हस्तांदोलन, मिठी मारून स्वागत करणे, चुंबन घेऊन प्रेम व्यक्त करणं अशा काही अभिवादनाच्या प्रमुख सवयींमध्ये गेल्या महिन्याभरात कमालीचे बदल झालेले पहायला मिळाले जस की….
चीन
चीनमधील वुहान हे शहर कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. येथे कोरोनामुळे ३ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. अनेक लोक कोरोनाच्या भीतीनं घराबाहेर पडणं टाळत आहेत. या रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी हस्तांदोलन करणं टाळावं अशा सूचना ठिकठिकाणी करण्यात आल्या आहेत. हस्तांदोलनाऐवजी पारंपरिक पद्धतीनं अभिवादन करण्याचं सुचवण्यात आलं आहे.
फ्रान्स
चुंबन घेत अभिवादन करण्याची किंवा स्वागत करण्याची सवय तूर्त बदला अशा प्रकारच्या सूचना फ्रान्सच्या वर्तमानपत्रात करण्यात आल्या आहेत. कोरोनानं फ्रान्समध्येही पाऊल ठेवलं आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत १३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चुंबन न घेता हस्तांदोलन करत किंवा मान डोलावून अभिवादन करण्याचं सुचवण्यात आलं आहे.
ब्राझील
ब्राझीलमध्ये सर्वांत लोकप्रिय असणार पेय chimarrao पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर न करण्याची सूचना करण्यात आली आहे.
स्पेन
स्पेनमध्ये वर्जिन मेरीच्या मुर्तीचे चुंबन न घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. इथल्या परंपरेनुसार येणारा प्रत्येक भाविक वर्जिन मेरीच्या हाताचे किंवा पायाचे चुंबन घेतो मात्र कोरोनामुळे येणाऱ्या भाविकांना असं न करण्याची सूचना करण्यात आली आहे.
न्यूझीलंड
न्यूझीलंडमध्ये अनेकांनी नाकाला नाक घासून स्वागत करण्याची पारंपरिक पद्धत बदलली आहे.
युएई
युनायटेड अरब एमिरातीनंदेखील हस्तांदोलन किंवा किस न करण्याचं आवाहन केलं आहे.