काश्मीरात अशांतता पसरवणाऱ्या डॉक्टर साहबचा खात्मा, लष्कराला मोठं यश
श्रीनगर – भारतीय लष्कराने रविवारी केलेल्या विशेष कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा मुख्य कमांडर डॉ सैफुल्ला मीर ऊर्फ डॉक्टर साहब याचा खात्मा केला आहे. श्रीनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांत श्रीनगरमध्ये अशांतता पसरली होती. त्यानंतर गरेथ भागात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्करानं मोहीम घेतली. यावेळी लष्करानं केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा मुख्य कमांडर डॉ. सैफुल्ला मरण पावला. तर त्याच्या एका सहकाऱ्याला जिवंत पकडण्यात आलं आहे, असं काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं.
ज्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी जम्मू काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी मोहीम हाती घेतली. यावेळी दबा धरून बसलेल्या दहशतावाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर जवानांनी गोळीबार सुरू केला. यात मुजाहिदीनचा मुख्य म्होरक्या डॉ. सैफुल्ला मीर उर्फ गाझी हैदर उर्फ डॉक्टर साहब हा जागीच ठार झाला. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात लष्कराला यश आलं.
माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. या कारवाई सैफुल्लासह दोन ते तीन अतिरेकी ठार झाले असल्याचं वृत्त आहे.