कामगार हक्क कार्यकर्ती नोदीप कौर हिला ४५ दिवसानंतर शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात
![Labor rights activist Nodip Kaur granted bail on Friday after 45 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/kaur.png)
नवी दिल्ली – कामगार हक्क कार्यकर्ती नोदीप कौर हिला अखेर शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आलाय. गेल्या १२ जानेवारीपासून नोदीप कौर तुरुंगात बंद होती. हरयाणात मजुरांसाठी काम करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नोदीप कौर हिच्याविरुद्ध शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात सहभागी होण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तीन प्रकरणांत जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी तिची करनाल तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटकेनंतर आपण सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देणार असल्याचं नोदीप कौर हिनं म्हटलंय.
नोदीपची अटक बेकायदेशीर?
दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर कुंडलीमध्ये कामगारांच्या एका आंदोलनात सहभागी झालेल्या नोदीप कौर हिला १२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. हे आंदोलन त्याच वेळी सुरू होतं जेव्हा तीन नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. यातील पंजाब-हरयाणातून सीमेवर दाखल झालेल्या शेतकऱ्यांपैंकी अनेकांनी कुंडलीतही ठाण मांडलं होतं.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या दलित तरुणी नोदीप कौर हिला प्रशासनाकडून निशाणा बनवण्यात आल्याचा आरोप समर्थकांकडून करण्यात येतोय. नोदीप कौर हिच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय खंडणी, चोरी, दंगल भडकावणं, बेकायदेशीर जमावात सहभाग घेणं तसंच धमकीचा आरोप होता.
नोदीप कौर ही मूळची पंजाबच्या मुक्तसरची रहिवासी आहे. ती सोनीपतच्या कुंडलीच्या औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करते. तीचं कार्यालय दिल्ली-हरयाणा सीमेवरून (शेतकरी आंदोलनाच्या स्थळापासून) केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. नोदीपसोबतच तिचा सहकारी शिवकुमार यालाही अटक करण्यात आली होती. नोदीपला खंडणी आणि धमकीच्या दोन प्रकरणांत जामीन मंजूर करण्यात आलाय.