…कर्नाटकातील प्रवाशांनाही महाराष्ट्रात नो एन्ट्री; महाराष्ट्रातील या मंत्र्याने दिला इशारा
![Kolhapur's Guardian Minister Satej Patil shocked!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/satej-patil-kolhapur-1.jpg)
…कर्नाटकातील प्रवाशांनाही महाराष्ट्रात नो एन्ट्री; महाराष्ट्रातील या मंत्र्याने दिला इशारा
कोल्हापुर । प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश नाकारला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणी नसल्यास प्रवेश नाकारून परत पाठविले जात आहे. कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी, त्याच राज्य सरकारने घ्यायला हवी. अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर ही बंदी घालू, असा सज्जड इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी कर्नाटक सरकारला दिला. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत, याबाबत मुख्य सचिवांशी तसेच कर्नाटक सरकारशीही चर्चा केली जाईल. असेही त्यांनी सांगितले.
पुणे-बंगळूर महामार्गावर कोगनोळी टोल नाका येथे कर्नाटक सरकारने तपासणी नाका उभारला आहे. आरटीपीसीआर तपासणी झाली, असेल तरच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे.यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पाटील यांनी सांगितले.
देश आणि जगभरातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तपासणी करून त्यांना गरज वाटल्यास क्वॉरंटाईन करण्याची जबाबदारी ही मुंबई महापालिकेने घेतली आहे. यामुळे कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी घ्यावी, अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू असेही, त्यांनी सांगितले.