एकत्र निवडणुकांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक
नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्र निवडणूका घेण्याबाबत निवडणूक आयोग आणि विधी आयोगाच्या प्रतिनिधींची पुढील आठवड्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती बी. एस. चौहान आणि त्यांच्या सहकार्यांना 16 मे रोची चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. एकत्र निवडणुकांच्या बाबत विधी आयोगाने एक रिपोर्ट जारी केला आहे. तो कालच सादर करण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने त्यांना चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे.
विधी आयोगाने म्हटले आहे की सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून दोन टप्प्यात सर्व राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेता येणे शक्य आहे. त्यासाठी लोकप्रतिनीधी कायद्यातील काही तरतूदींमध्ये बदल करावे लागतील. संसदेतील साध्या बहुमताने हे बदल करणेही शक्य असल्याचे मत विधी आयोगाने दिले आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी काही राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका घेऊन उर्वरीत विधानसभेच्या निवडणुका सन 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी घेता येतील. त्यानंतर सर्व देशभर एकत्रच निवडणूक प्रक्रिया घेणे शक्य आहे असेही विधी आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची वेळ आली तर ईव्हीएम मशिन्स आणि पेपर ट्रेल मशिन्स मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागणार आहेत. त्यासाठी सध्याच्या भावाने किमान 9284 कोटी रूपये खर्च येणार आहे असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.