उबेरची अमेरिकत फ्लाईंग टॅक्सी सेवा
लॉस एंजल्स – जगभर कॅब टॅक्सी सेवा देणाऱ्या उबेर कंपनीने आता अमेरिकेतील शहरांमध्ये फ्लाईंग टॅक्सी सेवा देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी त्यांनी नासा या अंतरीक्ष संशोधन संस्थेशी करार केला आहे. अर्बन एअर मोबीलिटी नावाने ही सेवा सुरू केली जाणार असून त्यात ड्रोन द्वारे दिल्या जाणाऱ्या पार्सल सेवांचाही समावेश असणार आहे. वाहतूक विषयक तज्ज्ञ आणि ट्रान्सपोर्टेशनच्या एका परिषदेच्यावेळी उबेरने ही घोषणा केली आहे. या परिषदेत शहरी भागातील नवीन वाहतूक सेवेबाबत चर्चा झाली.
आता उबेरने नासाशी केलेल्या करारानुसार फोन करून जशी टॅक्सी मागवता येते तशी छोटी विमान सेवाही लोकांना उपलब्ध होणार आहे. नासाने उबेरचा या सेवेविषयीचा तांत्रिक प्लॅन मंजुर केला आहे. नेहमीच्या विमानसेवेपेक्षा ही विमान सेवा सुटसुटीत असणार आहे. छोट्या आकाराच्या विमानतळांच्या उभारणीतून ती सेवा राबवण्याची प्राथमिक संकल्पना आहे त्यासाठी डल्लास येथे नासाने उबेरला रिसर्च फॅसिलिटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.