उद्यापासून सिनेमागृह १०० टक्के क्षमतेने सुरू होणार, केंद्र सरकारची नियमावली
![Cinemas and theaters in the state start from October 22; New rules](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/thetar.jpg)
नवी दिल्ली – समस्त सिनेप्रेमींसाठी केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली. उद्या, १ फेब्रुवारीपासून देशभरात १०० टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील लोकांच्या बसण्याची क्षमता ही एसओपीचं पालन करून सध्याच्या 50 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
माहिती प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीअंतर्गत निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना सिनेमागृहाच्या आतमध्ये असलेल्या स्टॉलवरून पदार्थ खरेदी करता येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काही निर्बंध अजूनही घातलेले आहेत, कारण आता कोविड संपुष्टात येण्याच्या मार्गावर असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सभागृहाच्या आवाराच्या आतमध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षा विषयक उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. सामान्य मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, श्वसन विषयक शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे, चेहऱ्यावर मास्क वापरणे, सभागृहात आणि बाहेर किमान 6 फूट आणि जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रतिक्षा कक्षांमध्ये थुंकणे प्रतिबंधित असेल आणि आरोग्य सेतूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
सिनेमागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेशद्वाराशी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग झाले पाहिजे. येथील गर्दी टाळण्यासाठी रांगेत उभे राहून ही प्रक्रिया पार पाडावी. एक स्क्रीन किंवा अनेक स्क्रीन असलेल्या सिनेमागृहांमध्ये मध्यंतराच्या वेळी प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या दाराजवळ गर्दी टाळण्यासाठी लोकांना रांगेने बाहेर पडता यावे, याकरिता पुरेसा वेळ दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या वेळांची विभागणी केली जाईल.
शीतपेय, खाद्यपदार्थ, तिकीटे इत्यादीच्या व्यवहारासाठी संपर्क टाळण्यासाठी डिजीटल पद्धतीचा वापर करण्यास मानक कार्यपद्धती प्रोत्साहन देते. दिवसभर बॉक्स ऑफिसवर काउंटरवरची पुरेशी संख्या सुरू ठेवली जाईल आणि तिकीट खिडकीवर तिकीट विक्री चालू राहील आणि विक्री काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून आगाऊ बुकिंग करण्यासाठीही परवानगी देण्यात येईल.