इराणमध्ये 75 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू,मोठ्या प्रमाणात कबर खोदण्याचे काम सुरु
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-173.png)
एकीकडे चीन आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसबाधित नव्या रुग्णांची संख्या वेगाने खाली येत असतानाच दुसरीकडे इराण आणि इटली या दोन्ही देशांमध्ये चित्र अजून चिंताजनक असेच आहे. इराणमध्ये गुरुवारी ७५ जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. यामुळे इराणमध्ये या आजारामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४२९ झाली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/12-5-1024x683.jpg)
कोरोना व्हायरसचे संक्रमण इराणमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाले आहे की मृतदेहांच्या दफनविधीसाठी मोठ्या प्रमाणात कबर खोदण्याचे काम केले जात आहे. या कबरी अंतराळातून उपग्रहांच्या माध्यमातून दिसताहेत. इतकी त्यांची संख्या जास्त आहे, असे वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. तेहरानपासून १४५ किलोमीटरवर असलेल्या कोम प्रांतात या कबरी खोदण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/25893960-8105543-October_This_view_from_last_year_before_the_coronavirus_outbreak-m-8_1584030611147.jpg)
२१ फेब्रुवारीपासून या ठिकाणी कबरी खोदण्याचे काम सुरू आहे. पण त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होते आहे. एकूण १०० यार्डामध्ये या कबरी खोदण्यात येत आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/3-16.jpg)
दरम्यान, इराणच्या मदतीला आता चीनने आपले पथक पाठवले आहे. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक मदत या पथकाकडून केली जाणार आहे. इराणने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी तातडीच्या निधीतून पाच अब्ज डॉलर देण्याची मागणीही केली आहे.