आता चीनवर असणार भारताचा ‘तिसरा डोळा’, अमेरिकेकडून खरेदी करणार तब्बल 22,000 कोटींचे 30 गार्डियन ड्रोन
नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावात आता भारत अॅक्शन मोडमध्ये आलेला आहे. चीनच्या कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून 30 MQ-9B गार्डियन ड्रोन खरेदी करणार आहे. याद्वारे, LACरील चीनच्या प्रत्येक कृतीची जाणीव वेळेत होऊ शकतेय. लवकरच या ड्रोनशी संबंधित खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेत सादर करण्यात येणार आहे.
यासह, भारत उपग्रह संप्रेषण यंत्राद्वारे आपल्या विद्यमान इस्त्राईल हेरॉनच्या ताफ्याला मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. चीन सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेता भारत आपली संरक्षण खरेदी अधिक तीव्र करीत आहे. वेपन्स सिस्टम ते मिसाईल तंत्रज्ञानावर भारत अधिक भर देत आहे. गरजेनुसार काही शस्त्रे परदेशातूनही खरेदी केली जात आहेत. आता संरक्षण मंत्रालय अमेरिकेकडून 30 जनरल अॅटॉमिक्स MQ-9B रेपर ड्रोन खरेदी करण्याची तयारी करत आहे. वृत्तानुसार हा करार सुमारे 22,000 कोटी रुपयांचा असेल. हा करार दोन भागात होईल. प्रथम सहा रेपर मध्यम उंचीचे ड्रोन खरेदी केला जाईल. त्यानंतर उर्वरित 24 ड्रोन पुढील तीन वर्षांत देण्यात येतील.