आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी
![Ban on international passenger flights till March 31](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Air_India_One_777-300ER.jpeg)
नवी दिल्ली – भारताने कोरोना संकटामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. या बंदीची मुदत संपण्याच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) जाहीर केले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूक आणि कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. कोणत्याही देशासोबतच्या मालवाहतूक आणि कुरिअर सेवेवर बंदी घातलेली नाही. सुरक्षा नियम आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करत हे कामकाज सुरू राहणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली असली तरी वंदे भारत मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे. तसेच २७ देशांसोबत एअर बबल करारानुसार प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे. प्रवासी विमानातून भारतात येणाऱ्या तसेच भारतातून परदेशी जाणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या तब्येतीविषयी माहिती जाहीर करण्याचे तसेच प्रवासाला निघण्याआधी कोरोना चाचणी करुन घेण्याचे बंधन आहे. ज्या देशात जायचे आहे त्या देशाने संबंधित प्रवाश्याविषयी हरकत घेतली नसेल आणि प्रवासाच्या २४ ते ७२ तास आधी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असेल तरच प्रवासाची परवानगी आहे.
तसेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोणत्या परिसरातून निघालो आणि विमानातून उतरल्यानंतर शेवटी कोणत्या ठिकाणी वास्तव्यास जाणार याबाबत माहिती विमानतळावर जाहीर करण्याचे बंधन आहे. त्याचबरोबर स्वतःच्या घरी जात आहोत की मित्र, नातेवाईक यांच्याकडे मुक्काम आहे की एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम आहे हे जाहीर करण्याची सक्ती आहे. तर एखाद्या प्रवाशाला कोरोना झाल्यास तो कोणाच्या संपर्कात आला हे शोधणे सोपे व्हावे यासाठी ही माहितीही जाहीर करण्याचे बंधन आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आवश्यकतेनुसार होम क्वारंटाइन आणि इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन यांची तरतूद आहे. क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करण्याचे बंधन प्रवाशांना लागू आहे.
— DGCA (@DGCAIndia) February 26, 2021