अमेरिकन लेखिकेच्या आरोपांमुळे पाकिस्तानात खळबळ; माजी गृहमंत्र्यांवर केला बलात्काराचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/rehman-malik.jpg)
एका अमेरिकन लेखिकेने पाकिस्तानातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे सर्व नेते पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंधित आहेत. “२०११ साली माझ्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून रेहमान मालिक यांनी माझ्यावर बलात्कार केला” असा आरोप या अमेरिकन महिलेने केला आहे. रेहमान मलिक पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि माजी आरोग्य मंत्री मखदूम शाहबुद्दीन यांच्यावर सुद्धा या महिलेने आरोप केले आहेत. इस्लामाबादच्या प्रेसिडंट हाऊसमध्ये दोघांनी मला मारहाण केली असा आरोप या महिलेने केला आहे. त्यावेळी असीफ अली झरदारी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. आरोप करणाऱ्या या अमेरिकन महिला ब्लॉगरचे पाकिस्तानातील विद्यमान सत्ताधारी पक्षाबरोबर चांगले संबंध आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकन महिला लेखिकेने केलेल्या या आरोपांमुळे बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पीपीपी पक्षाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे नाव खराब केल्याबद्दल पीपीपीच्या एका सदस्याने या अमेरिकन महिलेविरोधात तक्रार नोंदवली आहे. मूळची अमेरिकन असली तरी पाकिस्तान या महिलेचे दुसरे घर आहे. वरिष्ठ वर्तुळात तिची उठबस आहे.
आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे सबळ पुरावे असून पुढच्या आठवडयात ते सादर करीन असे या महिला ब्लॉगरने म्हटले आहे. मागच्या आठवडयात या महिलेने बेनझीर भुत्तो यांच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या पुस्तकाचे काही भाग टि्वटरवर पोस्ट केले होते. यामध्ये बेनझीर भुत्तो, त्यांचा मुलगा बिलावल आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्या शेरी रेहमान यांच्या खासगी जीवनाबद्दल काही गोष्टी आहेत.